आरक्षणासह ओबीसी समाजाच्या सर्व समस्या सोडवा
प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या निवेदनासह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. राजकीय आरक्षण असो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मुद्दे असो, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर होणारा अन्याय योग्य नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने आपण या समाजाच्या सर्व समस्यांची गंभीर दखल घेऊन न्याय द्यावा, असे पत्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या निवेदनासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. परंतु त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊनही अडिच वर्ष झाली तरी हा प्रश्न अजून कायमच आहे. मध्यंतरी ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका झाल्या हा या समाजावर अन्यायच आहे.ओबीसी मुला-मुलींसाठी ७२ वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याची अजून अंमलबजावणी अजून झालेली नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचाही प्रश्न आहे, शासकीय नोकरभऱती बंद असल्याने हा समाज नोकरीपासून वंचित राहिलेला आहे. यासह सर्व समस्यांची दखल घेऊन तातडीने सोडवाव्यात असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.