कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र
मुंबई : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.
डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत. डॉ. व्यास यांनी नमूद केले आहे की, राज्यातील चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. एक जूनच्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. ही बाब तत्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान 980 चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी साठ टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड 19 पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील तर त्यावर नजर ठेवली जावी.
राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे श्री. व्यास यांनी नमूद केले आहे.
नजिकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.
ताप आणि सारीने आजारी असणारे रुग्णांवर लक्ष ठेवून रहावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांनी चाचणी करुन घेण्यास सांगावे.सहव्याधी असणारे ज्येष्ठ नागरिकांना एस एम एस चा( सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सैनिटायझेशन) वापर करण्यास सांगावे. कोविड अनुकूल वर्तन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात यावे. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.