पी. एम. किसान योजनेचे लाभार्थी असाल तर नक्की वाचा!

  • जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांचे आवाहन


रत्नागिरी, दि. 22  : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच CSC केंद्र आणि कृषी विभाग / महसूल विभाग/ग्रामविकास विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

AGRISTACK योजनेत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अॕग्रीस्टॅक योजना १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. अकराव्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४ लाख ८७ हजार ९३६ खातेदार असून या योजनेअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण २ लाख ११ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.
फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण एकूण खातेदारांच्या तुलनेत ४३ टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७१ हजार ६३६ शेतकऱ्यांची पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे. या अॕक्टिव पी. एम. किसान लाभार्थीपैकी आज अखेर १ लाख २३ हजार १४ लाभार्थीची अॕग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाली असून, त्याचे प्रमाण ७१ टक्के आहे. दिनांक ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयान्वये कृषी विषयक योजना जसे की पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पी एम किसान योजना इ. चा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेमधील लाभार्थी यांना अॕग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच पी. एम. किसान पोर्टलवर नवीन स्वयंनोंदणी करण्यासाठी देखील अॕग्रीस्टॅकमधील फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. त्यामुळे योजनेतील पुढील २० वा हप्ता अॕग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असणाऱ्या लाभार्थींनाच अदा केला जाणार आहे. अद्यापही पी एम किसान मधील अॕक्टिव लाभार्थीपैकी ४८ हजार ६२२ लाभार्थी तसेच एकूण खातेदार पैकी २ लाख७६ हजार ९०० खातेदार अॕग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे प्रलंबित आहेत. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ३१ मे २०२५ अखेर १०० टक्के नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री महोदय, कृषिमंत्री आणि आयुक्त यांनी शेतकऱ्यांना अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये १०० टक्के नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE