लांजा : एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचा लांजा तालुक्याने जणू धडाकाच लावला आहे. लांजा साटवली येथील येथील तलाठी जिज्ञा विजयकुमार वागळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालयमध्ये कक्ष अधिकारीपदी मजल मारली आहे.
जिज्ञा वागळे हीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिज्ञा वागळे ही विद्यार्थी दशेपासूनच अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी. चौथी तसेच सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत तिने मेरिटमध्ये यश मिळवले होते. दहावीमध्ये शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत जिज्ञा चमकली होती. जिज्ञाची यशाची कमान बहरत होती. पुणे येथे इंजीनियरिंग करून ती स्पर्धा परीककक्षेची तयारी करत होती. स्पर्धा परीक्षा करता करता महसूल विभागातील तलाठी या पदासाठी तिने परीक्षा देऊन त्यात तिने विशेष प्रविण्य मिळवून तिने तलाठी या पदावर नोकरीही पत्करली.
इतक्यावरच न थांबता ती नोकरी करून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीकक्षेची तयारी करून ती अखेर महाराष्ट्र मंत्रालय कक्षा अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती सध्या लांजा तालुक्यातील साटवली सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.
नुकताच तिचा विवाह कोकण रेल्वेत इंजिनिअर असलेल्या पाटील यांच्याशी झाला आहे. नोकरी करूनही स्पर्धा परीक्षा देऊन उज्वल यश संपादन करता येते आणि अधिकारी होऊ शकतो, हे जिज्ञा हीने दाखवून दिले आहे. यात जिज्ञाची जिद्द मेहनत चिकाटी महत्त्वाची ठरली आहे. जिज्ञा ही लांजातील प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिक श्री विजयकुमार वागळे यांची मुलगी आहे. जिज्ञाचा भाऊ निमेश हा गुजरात येथील बड्या इंडियन ऑइल कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर आहे.
या आधी लांजातील काही मेहनती विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा क्रॅक करून अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. स्पर्धा परीक्षांद्वारे ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेची झलक लांजा तालुक्याने दाखवून दिले आहे.