https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांचा आ. शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार

0 107
  • सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेचे माजी विद्यार्थी

संगमेश्वर दि. २१ :  कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट -सावर्डे हे चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास कसा होईल या साठी सतत प्रयत्नाशील असते. त्यामुळे येथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी संपूर्ण जगात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. असाच एक माजी विद्यार्थी सागर बगाडे यांनी कलेचा वारसा जपत स्वतः बरोबर आपल्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट-सावर्डेचे नाव राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त करुन संपूर्ण देशात पोहोचवले आहे.

सागर बगाडे यांचा नुकताच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्री कला महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा.प्रकाश अर्जुन राजेशिर्के, चित्रकार अनिल अभंगे, चित्रकार पेहलवान , प्राचार्य माणिक यादव -प्राचार्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट तसेच प्राध्यापक वृंद, माजी विद्यार्थी अनिल पाटील, जयसिंग लोहार, जितेंद्र कुमार कांबळे , सिद्धेश्वर शिंदे, दीपक सलगरे, उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सागर बगाडे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप हाल -अपेष्टा आणि खस्ता खाल्ल्या आहेत. पंढरपुरातील एका अनाथ आश्रमात त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर सांगलीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर १९९६-९७ साली चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी कोकणातील अग्रगण्य चित्र- शिल्प कलामहाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. कला शिक्षक पदविका या अभ्यासक्रमात शिकत असताना येथे त्यांना चित्रकले बरोबरच आदर्श कला शिक्षक कसे बनायचे , त्याचबरोबर नृत्य,नाट्य,चित्र,शिल्प, गायन, वादन या ललित कलांची बीजे त्यांच्या मनात रुजवली गेली. याचे संपूर्ण श्रेय ते कोकणचे ज्येष्ठ चित्रकार -शिल्पकार व सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के त्याचबरोबर कलामहाविद्यालयास दिले आहे .

सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट – सावर्डे मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००१ साली न्यू इंग्लिश स्कूल – कोल्हापूर मध्ये कला शिक्षक म्हणून रुजू झाले. अतिशय आत्मीयतेने कलाशिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी एक आदर्श कलाशिक्षक ,
नृत्यदिग्दर्शक , नृत्यकर्मी,चित्रकार,सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळेच आज तागायत संपूर्ण महाराष्ट्रातून आदर्श शिक्षक पुरस्कार खूप जणांना मिळाले पण एका कला शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे ही पहिलीच वेळ आहे. हा पुरस्कार ५ सप्टेंबर २०२४ या दिवशी दिल्लीतील विज्ञान भवनात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला

याचेच औचित्य साधून दि.२० सप्टेंबर २०२४ शुक्रवार या दिवशी माजी विद्यार्थ्यास कौतुकाची थाप म्हणून सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रम प्रसंगी शेखर निकम बोलताना म्हणाले की, असे विद्यार्थी महाविद्याल्याबरोबर आपल्या संस्थेचे नाव मोठे करताहेत याचा सार्थ अभिमान आहे. आणि सागर बगाडे यांनी राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपले नाव मोठे करावे, अशा मी शुभेच्छा देतो.

सत्काराप्रसंगी सागर बगाडे बोलताना म्हणाले की, मला येथे औपचारिकता शिक्षणापेक्षा राजेशीर्केसरांनी अनौपचारिक शिक्षण देखील दिले त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहचू शकलो. तसेच त्यांच्या पत्नी सौ. युगंधरा राजेशिर्के म्हणजेच ताई यांनी घरच्यांसारखी वागणूक दिली त्यामुळे घराची उणीव भासली नाही. व या खडतर प्रवासात देखील मी तग धरून राहू शकलो असे बगाडे यांनी स्पष्ट केले .

Leave A Reply

Your email address will not be published.