मुंबई : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या रविवारी झालेल्या छत्रपती शिवाजी पार्कवर झालेल्या सांगता सभेत हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा साधा उल्लेखही केला नसल्याची खंत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली असून बाळासाहेबांच्या सभेने जे शिवाजी पार्क गर्दीने फुलून जायचे त्या ठिकाणी केवळ आणि केवळ नैराश्य पाहायला मिळाले, अशी टीका ना. सामंत यांनी व्यक्त केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्विटर ) वर त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेचा समाचार घेतला आहे.
राज्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या सांगता सभेविषयी म्हटले आहे की, शिवाजी पार्कवरील सभा फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रेरणादायी असायची.. “माझ्या तमाम हिंदू बांधवानो,भगिनींनो आणि मातानो” हे ऐकताच लाखो शिवसैनिक टाळ्यांनी प्रतिसाद द्यायचे. आत्ता सर्वच बदलले आहे. राहुल गांधीच्या भाषणात बाळासाहेबांचा साधा उल्लेखही नाही. ज्यानी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान केला त्या राहुल गांधी यांच्यासोबत जाऊन काय साधले, असा सवाल ना. सामंत यांनी उपस्थित केला.
ज्या लाखो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना वाढवली त्यांना काय वाटत असेल. काल सिद्ध झाल शिवाजी पार्क राहुल गांधी यांच्यासाठी नाही तर फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी आहे आणि म्हणुनच जे शिवाजी पार्क लाखो शिवसैनिकांनी फुलून जायचे. त्याठिकाणी रविवारी नैराश्य होतते. पंतप्रधान नरेंद्र यांच्या विरोधात एवढे सगळे पक्ष एकत्र येऊन देखील सभेसाठी गर्दी जमली नाही. कितीही अपशकुन करा “NDA महाराष्ट्रात 45 पार आणि I.N.D.I.A देशातून हद्दपार”, अशा शब्दात उद्योग मंत्री सामंत त्यांनी या सभेचा समाचार घेतला आहे.