कोकण रेल्वे मार्गावर पर्यायी गाडीची गरज झाली अधोरेखित
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान आज दि. ९ जून रोजी वन वे स्पेशल गाडी (01149) चालवली जात आहे. विशेष म्हणजे अवघे दोन दिवस आधी ही गाडी बुकिंगसाठी खुली करूही ती बहुतांश भरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेसच्या धरतीवर दुसऱ्या गाडीची गरज किती आहे, ही बाब अधोरेखित झाली.

कोकण रेल्वे मार्गे जाणारी मुंबई सीएसएमटी- मडगाव अशी वनवे स्पेशल गाडी आज शुक्रवारी धावत आहे. ही गाडी शुक्रवारी पहाटे ५ वाजून 30 मिनिटांनी सुटणार होती. मात्र, प्रत्यक्षात तीन ६ वाजून ४८ मिनिटांनी सुटली आहे. वनवे स्पेशल गाडी आयआरसीटीसी तसेच कोकण रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर आरक्षणासाठी अवघा एक दिवस आधी खुली करण्यात आली. असे असतानाही या गाडीचे बुकिंग चांगल्या प्रकारे झाले.
जनशताब्दीला नसलेले थांबे देऊन पर्यायी गाडी चालवण्याची मागणी

अवघे दोन दिवस आधी गाडी आरक्षणासाठी खुली करूही गाडी बहुतांश भरल्याने मध्य तसेच कोकण रेल्वेने सावंतवाडी अगर मडगावपर्यंत सध्याच्या जनशताब्दी एक्सप्रेसला ज्या प्रमुख स्थानकांवर थांबे नाहीत त्या थांब्यांचा प्राधान्याने समावेश करून जनशताब्दीच्या धर्तीवर दुसरी गाडी चालवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनशताब्दीसारखी गाडी प्रवास भाड्याच्या दृष्टीने सामान्यांच्या आवाक्यातली असल्यामुळे या गाडीसाठी कोकणवासी प्रवासी जनतेचा आग्रह आहे















