गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे यांची ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा भावी कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर जिल्हाधिकारी व निवड समितीच्या वतीने तीन वर्षाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशातील ग्राहक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वात मोठ्या ग्राहक संघटनेचे कोकण प्रांताचे (पालघर, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) अध्यक्ष आहेत. गेली २० वर्ष ग्राहक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना ग्राहक संघटन, ग्राहक जागृती,ग्राहकांच्या विविध समस्या सोडविणे,ग्राहक संरक्षण कायद्याचे उद बोधन, विविध हायस्कुल, महाविद्यालय येथे विद्यार्थी ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेच आयोजन, तहसील कार्यालय व अन्य ठिकाणी राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करून ग्राहक हिताशी संबंधीत मार्गदर्शन, ग्राहकाला काही समस्या निर्माण झाल्यास ग्राहक व संबंधित वस्तू किंवा सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्यात समन्वयातून मार्ग काढणे, समन्वय न झाल्यास संबंधित ग्राहकाला जिल्हा,राज्य किंवा राष्ट्रीय आयोगाकडे जाण्यास विनामूल्य मार्गदर्शन करणे, मोफत मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध समस्या सोडविणे, कोकण प्रांतातील कार्यकर्त्याचा अभ्यासवर्ग घेऊन संघटनेच्या ध्येय धोरणानुसार संघटनात्मक बांधणी करणे, ग्राहकांच्या हिताशी संबंधीत अखिल भारतीय स्तरावरून येणाऱ्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणे, विविध संस्था, मंडळे, शासकीकार्यालये इ. ठिकाणी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक जागृती उदबोधन करणे, विध्यार्थी ग्राहकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, विद्यार्थी ग्राहक गट योजना राबवून सुजाण जागृत ग्राहक निर्माण करणे अशी विविध ग्राहकाभिमुख कार्य स्वतः संघटना व कार्यकर्ते यांचे माध्यमातून केलेली आहेत.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्याने ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षाचा ग्राहक क्षेत्रातील अनुभव ग्राहक समस्या निराकणासाठी होणार आहे. आपल्या अभ्यासू व सेवाभावी वृत्तीने ग्राहक हिताशी संबंधीत विविध विषय ग्राहक संरक्षण परिषदेत मांडून जिल्ह्यातील ग्राहकांना विविध समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.














