रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या पर्यटनविषयक कार्यक्रमातून यावेळी रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्य बंदर, सागरी मत्स्यालय आणि रत्नदुर्ग किल्ल्याची माहितीपूर्ण सफर घडणार आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मत्स्य बंदर असून, येथून मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय चालतो. या बंदराचे महत्त्व, येथील मत्स्य व्यवसाय आणि मच्छीमारांच्या जीवनाशी असलेले त्याचे नाते याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक मच्छीमार कोणत्या पद्धतीने मासेमारी करतात, त्यांच्या पारंपरिक मासेमारीच्या पद्धती आणि अनुभव याविषयी कर्ला गावातील स्थानिक मच्छीमार मोअजम सोलकर माहिती देणार आहेत.
रत्नागिरीतील सागरी मत्स्यालय हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. समुद्रात आढळणाऱ्या विविध प्रजातींचे मासे, त्यांचे वैशिष्ट्य आणि मत्स्यालयात जतन करून ठेवण्यात आलेला भव्य देवमाशाचा सांगाडा याविषयी प्रा. डॉ. केतन कुमार चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी माहिती देणार आहेत.
रत्नागिरीच्या इतिहासाची आणि सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या रत्नदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये, त्याचा इतिहास आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व याविषयी दुर्ग अभ्यासक संयोगिता सासणे मार्गदर्शन करणार आहेत.
‘कोकण दर्शन’चे लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन आणि निर्मितीसाठी वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचे सहकार्य आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा विशेष माहितीपूर्ण कार्यक्रम शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होणार आहे. आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यमलहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफ.एम. १०१.५ मेगाहर्ट्झ तसेच न्यूजऑनएअर मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम ऐकता येईल. आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब आणि फेसबुक-इन्स्टाग्रामच्या अधिकृत माध्यमांवरही कार्यक्रमाशी जोडले जाता येईल.
कोकणच्या सागरी जीवनाचा, मत्स्य व्यवसायाचा, सागरी जैवविविधतेचा आणि ऐतिहासिक वारशाचा वेध घेणारा हा ‘कोकण दर्शन’चा विशेष भाग श्रोत्यांसाठी नक्कीच माहितीपूर्ण ठरणार आहे.












