रत्नागिरीसाठी सी प्लेनचा चांगला पर्याय : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

रत्नागिरी : रत्नागिरी तटरक्षक दलाचा एअरपोर्ट तसेच समुद्र या दोन्ही गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी सी प्लेनचा पर्याय आपण सुचवला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. सी प्लेन म्हणजेच पाण्यावर उतरणारे विमान रत्नागिरीसाठी फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला. यासाठी आपण राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना लक्ष घालण्यासाठी सांगितले असल्याचे ना. गडकरी म्हणाले.

धावपट्टी आणि जवळच समुद्र या दोन्ही अनुकूल गोष्टी उपलब्ध असल्यामुळे रत्नागिरीसाठी पाण्यावर उतरणारी विमाने चालवणे शक्य असल्याचे ते म्हणाले. सर्व साधारणपणे  १८ सिटर एका विमानासाठी १८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित  असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईतील बीपीटी येथून रत्नागिरीसाठी समुद्राच्या पाण्यावर उतरणारे विमान चालवण्यासाठी आपण राज्य शासनाला सूचना केली असल्याचे गडकरी म्हणाले. 

सी प्लेनमुळे पर्यटनातही वाढ होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हे सी प्लेन रत्नागिरी लाभलेल्या किनारपट्टीवर कुठल्याही गावात उतरवता येईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE