अलिबाग : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, डीईआयसी कार्यक्रम व क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्लब फूट क्लिनिकचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र रोकडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, आयएमए अध्यक्ष तथा बालरोगतज्ञ डॉ.विनायक पाटील, अस्थिरोगतज्ञ डॉ.आशिष मिश्रा, डॉ.कृष्णा बडगिरे, अधिसेविका श्रीमती अनिता भोपी, रोटरी क्लब ऑफ अलिबाग श्री.निमिष परब व क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट यांच्यामार्फत राज्य कार्यक्रम समन्वयक श्रीमती विपुलता आमले, विभागीय समन्वयक श्री. शिवम पाठक व जिल्हा समुपदेशक श्रीमती स्नेहल पाटील हे उपस्थित होते.
क्लब फूट ही एक जन्मजात विकृती आहे. ज्यामध्ये पायाचा घोटा व पायाचे अंगठे वाकडे असतात. यामध्ये पायाचा समोरील भाग आतील बाजूला वाकलेला असणे, अंगठे खालील बाजूला वाकलेले असणे, बालक तळपायाच्या बाहेरील भागाच्या साहाय्याने पाय ठेवत असणे, पायाच्या हालचालमध्ये कठोरता असणे अर्थात तळपायास पायाच्या समोरील दिशेस वळवता येत नाही. टाचेमध्ये कठोरता असणे. दोन्ही तळपाय समोरासमोर असणे, अशी लक्षणे आढळून येणाऱ्या सर्व बालकांवर क्लब फूट क्लिनिकच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दर गुरुवारी अस्थिरोगतज्ञ यांच्याकडून तपासणी करून पोंसेटी पद्धतीने उपचार करून 5 ते 8 आठवड्यापर्यंत कास्टिंग करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट यांच्यामार्फत उपचार झालेल्या बालकांना विशेष बुट सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी क्लब फूट असलेल्या बालकांना क्लब फूट क्लिनिकमध्ये संदर्भित करून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील आरबीएसके व डीईआयसी कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.















