करजुवेत खाडीत सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडी पट्ट्यात सक्शन पंपाद्वारे खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. ना रॉयल्टी, ना परवानगी तत्वावर सुरू असलेल्या या वाळू उपशाला खनिकर्म, महसूलचा आशीर्वाद असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा आणि तस्करी होत असताना महसुलच्या अधिकाऱ्यांना याचा मागमूस लागत नाही, याबाबत ग्रामस्थांना नव्वल वाटत आहे. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश असताना मंडळ अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सायंकाळी करजुवे तिसंग परिसरात अवघ्या एक ते दीड कि.मी. अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. देवरूख तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी तक्रारी करूनही हा वाळू उपसा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


महसूल कर्मचारी गावात असतानाही सुरू असलेल्या या बेसुमार वाळू उपशाबाबत स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सक्शनद्वारे सुरू असलेला वाळू व्यवसाय तत्काळ बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

एकीकडे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश असताना स्थानिक महसूल यंत्रणेला कोणावरही कारवाई करू नये अशा सूचना असल्याची चर्चा करजुवे परिसरात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक महसूल कर्मचारी कारवाई करत नसल्याची चर्चाही सुरू आहे. रत्नागिरी येथील खनिकर्म विभागानेही कारवाई करणे अपेक्षित असताना वाळू माफियांवर चाप का बसवला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खनिकर्म विभाग व वाळू माफियांमध्ये अर्थपूर्ण संबंध आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

लाखो रुपयांचा महसूल बुडतोय

करजुवेमध्ये कोणीही साधी हातपाटीची रॉयल्टी घेतलेली नाही. लाखो रूपयांचा महसूल बुडवून खुलेआम वाळूचे ढीग या गावामध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहे. मात्र, गावातील तलाठी, मंडल अधिकारी यांना मात्र हे ढीग दिसत नाहीत. त्यामुळे या वाळू माफियांचे साधले आहे. बेकायदा तसेच शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा सुरू असताना अधिकाऱ्यांना हे कसे दिसत नाही, असा सवाल विचारला जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE