कोकण भूमी प्रतिष्ठानच्या कोकण आयडॉल सन्मान सोहळ्यात १६ जुलैला होणार मुंबईत गौरव
लांजा : कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण फाउंडेशन, स्वराज्य भूमी कोकण या समृद्ध कोकण चळवळ उभारणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कोकण आयडॉल साठी लांजातील ओम अनंत प्रकल्प या अस्सल कोकणी संस्कृती जपणाऱ्या आणि साता समुद्रापार नेणाऱ्या गावाचे निर्माते ॲड. अभिजित जेधे यांची निवड झाली आहे.
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या २३ वा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा आणि कोकण व्हीजन २०३० परिषद रविवार दि. १६ जुलै २०२३ सायंकाळी ४ ते रात्रौ ९ वाजता मुंबई दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी येथील प्राचार्य बी.एन.वैद्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्ताने कोकणात कोकणचे वेगळेपण जपताना, कोकणची संस्कृती अबाधित ठेवण्याचे काम करणाऱ्या आणि कोकणाला पर्यटनदृष्ट्या नावलौकिक मिळवून देणाऱ्या कोकणातील विविधांगी क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा कोकण आयडॉल पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. कोकणच्या विकासात मौलिक योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान सुपुत्रांच्या सन्मान सोहळ्यात या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून ॲड. अभिजीत जेथे यांची निवड झाली आहे.
लांजातील अभ्यासू व्यक्तिमत्व, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष, कायदेतज्ञ, इतिहास -पर्यटन-पर्यावरण-कोकण-
कृषी क्षेत्रातील तज्ञ म्हणून सुपरिचित असलेल्या अभिजित जेधे यांची ही झालेली निवड अभिनंदनीय आहे.
गेली अनेक वर्ष कोकणातील पर्यटन, जैवविविधता, भौगोलिकता, इतिहास, संस्कृती, परंपरा या विषयांत अभ्यास करून कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या अभिजीत जेधे यांच्या आजवरच्या कार्याचा हा सन्मान म्हणून कोकण आयडॉलसाठी त्यांची झालेली ही निवड समाजाच्या सर्व स्तरातून प्रशंसनीय ठरत आहे.














