रत्नागिरी (प्रतिनिधी ) : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेकडून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या महिला अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि नवनिर्माण हायच्या विद्यार्थी, शिक्षकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला.
यावेळी संस्था चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालक सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे, मुख्याध्यापक नजमा मुजावर, प्रा. ताराचंद ढोबाळे आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. सचिन टेकाळे यांनी केले.
शांततेचं प्रतीक असलेल्या साथी एस. एम. जोशी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. अख्खा मणिपूर हिंसाचाराने जळत असताना कोणीही ब्र काढत नाही. त्यामुळे नवनिर्माण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी निषेध केला, हीच बाब महत्वाची ठरते. अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी हेगशेट्ये म्हणाले, मणिपूर या देशातील सेव्हन सिस्टर मधील एक निसर्ग संपन्न राज्य आहे. मात्र आज या सेव्हन सिस्टरचे अत्यंत हिन आणि लज्जास्पदतेने वस्त्रहरण होत आहे. एका बाजूला बेटी बढाओ, बेटी पढाओ म्हणतांना या देशातील बेटी तर सुरक्षित नाही. देशाच्या राजकारणाने आणि नैतिक अध:पतनाने इतकी निचतम पातळी यापुर्वी कधीच पाहिली नव्हती. मैतीचा शेकडोंचा समूह कुकी स्त्रींयाना खुलेआम मारझोड करतो, त्यांचे कपडे फाडून त्यांना नग्न करत त्यांची धिंड काढत आहे. त्या महिलांवर अत्याचार करत आहे. स्त्रीयांवर सामुहीक बलात्कार करत त्यांना ठार मारतात. या अत्यंत लांच्छनास्पद आणि घृणास्पद घटना निव्वळ पोलिसांच्या साक्षीने होत आहेत. राजकीय नेते याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत चक्क या देशांचे पंतप्रधान ज्यांची महागुरु ही जागतिक प्रतीमा मात्र ते मणिपूर हत्याकांड आणि स्त्री अत्याचाराबद्दल गप्प बसतात. हे फारच भिषण आणि देशाच्या संस्कृती, नैतिकता आणि स्त्रीयांबद्दलच्या मानवतेच्या दृष्टीकोनाला काळीमा फासणारे आहे. उद्या हा द्वेश, मत्सर, जात, आणि धर्म यांतील एकमेकांना उध्वस्त करणांरा विद्वेश आम्हा प्रत्यकाच्या घरांपर्यंत पोहोचणार आहे. या देशातील स्त्रीला टार्गेट करत तिची विटंबना करणे आणि हिंसा करणे ही घटना अत्यंत निंदनीय आहे.














