पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून टप्पा क्रमांक एक मधील सेवेचे लोकार्पण केले जाणार आहे.
आपल्या पुणे दौऱ्यात पंतप्रधान दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हेही वाचा : Konkan Railway | मडगाव- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा














