कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा ही सत्ताधारी नेत्यांची मानसिकता नाही : सुहास खंडागळे

  • कोकणच्या हिताचे धोरण राबवण्यास कोकणातील सत्ताधारी नेते अपयशी असल्याचा आरोप

रत्नागिरी : मागील दोन वर्षात कोकणाला दोन- दोन उद्योगमंत्री मिळाले तरीही येथे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होत नसेल तर येथील जनतेच्या हिताचे धोरण राबवण्याची मानसिकता सत्तेत बसलेल्या प्रस्थापित नेत्यांची नाही अशी रोखठोक भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी तळेकांटे येथे आयोजित कार्यक्रमात मांडली.

येथील रेवाळे वाडीत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बोलताना खंडागळे म्हणाले की,कोकणातील रोजगारासाठी तरुणांचे होणारे स्थलांतर हा गंभीर विषय असून या प्रश्नाकडे सत्ताधारी गांभीर्याने पाहत नाहीत.रिफायनरी सारखा एखादा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणावर लादून नागरिक आणि शासन यांच्यातील संघर्षात कोकणाच्या भविष्याची दहा दहा वर्ष वाया घालवली जातात,मात्र कोकणच्या हिताचे प्रकल्प कोकणात आणले जात नाहीत.मागील दोन वर्षात कोकणाला केंद्र व राज्य शासन असे दोन दोन उद्योग मंत्री मिळाले. मात्र तरीही कोकणच्या हिताचे उद्योग येथे येऊ शकले नाहीत.मुळात कोकणात तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा अशी प्रस्थापित राजकीय नेत्यांची मानसिकता नाही.गाव विकास समितीमार्फत वारंवार शासनाकडे येथील तालुकानिहाय एमआयडीसी विकसित करण्याची मागणी लावून धरण्यात आली. येथील एमआयडीसी देखील ओस पडलेल्या आहेत याकडे सुहास खंडाळे यांनी लक्ष वेधले.येथील तरुण शिक्षण घेतात आणि नोकरी धंद्यासाठी मुंबई पुणे अन्य शहरांमध्ये जातात. बेरोजगारी व स्थलांतर यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असून असे धोरण दुर्दैवाने शासनाकडून ठरवलं जात नाही असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले.कोकणाबाबत राज्य शासन उदासीन असून येथील वाढत्या बेरोजगारीला शासनाची कोकणाबाबतची भूमिका जबाबदार असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले.

यावेळी मंचावर गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी,महिला संघटना अध्यक्षा सौ.दिक्षा खंडागळे,सदस्य ऍड.सुनील खंडागळे,सदस्य मनोज घुग,उपसरपंच राजू येद्रे,तंटामुक्त अध्यक्ष,चंद्रकांत रेवाळे,तुकाराम रेवाळे,सौ.मनीषा बने,नवतरुण मित्रमंडळ रेवाळे वाडीचे सर्व पदाधिकारी,महिला,विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE