स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे मुंबईतील आझाद मैदान येथे गौरव सोहळा
मुंबई ( सुरेश सप्रे ): लांजा–रत्नागिरी तालुक्यातील कन्या आणि बदलापूरमधील सामाजिक-राजकीय क्षेत्रातील सक्रिय नेत्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
बदलापूरमधील तरुण, तडफदार महिला नेतृत्व
उबाठा शिवसेनेच्या संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा चव्हाण या बदलापूर शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात एक तरुण, तडफदार आणि प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने कार्य करत आहेत.
सामाजिक कार्यातून राजकीय वाटचाल
सामाजिक कार्याची आवड आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा संगम साधत त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात लांजा–रत्नागिरी येथून केली. प्रारंभी स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या कार्यामुळे जनसंपर्क वाढत गेला आणि त्याच काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
शिवसेनेतील संघटनात्मक जबाबदाऱ्या
संस्थात्मक कार्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी शिवसेना महिला आघाडी उपशाखा प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. काम करण्याची पद्धत, प्रभावी संवादकौशल्य आणि महिलांसाठीची सातत्यपूर्ण धडपड यामुळे त्यांना अल्पावधीतच मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या.














