दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धेत ३०० सायकलस्वारांचा सहभाग

‘लकी ड्रॉ’मध्ये २ सायकल आणि १ लाखाची बक्षिसे विजेत्यांना प्रदान

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली विंटर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात झाली. यामध्ये सर्व वयोगटातील ३०० हुन अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. तसेच माननीय आमदार योगेशदादा कदम यांनीही यामध्ये सहभागी होऊन सायकल चालवत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. दापोलीकर प्रोत्साहन देण्यासाठी या सायकल मार्गावर जमले होते. त्यामुळे दापोलीत रविवार सकाळ सायकलमय झाली होती.

सिटी शॉर्ट लूप आणि कोस्टल सिनिक रुट अशा वेगवेगळ्या मार्गावर असणारी ही सायकल स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ५:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झाली. यावेळेला प्रमुख अतिथी दापोलीचे आमदार श्री योगेशदादा कदम, सुनील दळवी, नगरसेविका कृपा घाग, शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, फाटक डेव्हलोपर्सचे अक्षय फाटक, डॉ रोहन पिंपळे, भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे सचिन तोडणकर, ज्योती नागवेकर, शशिकांत वराडकर, श्री सायकल मार्टचे मंदार बाळ, प्रो सायकलचे अयान, राहुल मंडलिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

या स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, गोवा अशा अनेक जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. ७५ किमी कोस्टल सिनिक रुट स्पर्धेचा मार्ग दापोली, उंबर्ले ओळगाव बुरोंडी लाडघर कर्दे मुरुड सालदुरे पाळंदे हर्णै पाजपंढरी आसूद दापोली अशा समुद्रकिनारी असणाऱ्या गावातून होता. ठिकठिकाणी स्पर्धकांचे स्वागत पाहुणचार करण्यात आला. स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये एकूण १ लाखाची अनेक बक्षिसे वाटण्यात आली. यामधील २ सायकल कोरेगाव सातारा येथील अनिकेत मोहाळे आणि दापोलीमधील अनिशा लयाळ यांनी जिंकल्या.

या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, पराग केळसकर, सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, मृणाल मिलिंद खानविलकर, उत्पल वराडकर, आकाश तांबे, वरुण महाजन, सर्वेश बागकर, अजय मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE