राज्य नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीला दोन रौप्य पदके

रत्नदुर्ग पिस्टल अ‍ॅण्ड रायफल शुटींग क्लबचे स्वयम विक्रांत देसाई आणि पुष्कराज इंगोले मानकरी

राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारलेल्या खेळाडूंची भोपाळमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शुटींग चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत रत्नागिरीच्या पदरी दोन पदके पडली आहेत. येथील रत्नदुर्ग पिस्टल अ‍ॅण्ड रायफल शुटींग क्लबमार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बाजी मारलेल्या स्पर्धकांची आता भोपाळमध्ये होणार्‍या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


37 वी महाराष्ट्र राज्य शुटींग चॅम्पियनशिप 2022 ही स्पर्धा मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 25 मीटर स्टॅण्डर्ड पिस्टल ज्यु. (पुरुष) या प्रकारात रत्नदुर्ग पिस्टल अ‍ॅण्ड रायफल शुटींग असो.च्या स्वयम विक्रांत देसाई याने ( स्कोअर 549/600) रौप्यपदक पटकावले तर 50 मीटर प्रोन रायफल प्रकारात पुष्कराज इंगोले यांनीही ( स्कोअर 586/600) रौप्य पदक पटकावले. इंगोले यांना स्पर्धेत दुसरी रँक मिळाली आहे. स्पर्धेत निर्झरा शिवाजी पाटील हिने चौथी रँक मिळवली.

रत्नागिरी ः राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत स्थान पक्के केलेला स्वयम विक्रांत देसाई.
रत्नागिरी ः राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत रजत पदक पटकावत दुसरी रँक मिळवलेले नेमबाज पुष्कराज इंगोले

महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या मुंबईतील वरळी येथील शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत सातारच्या राजवर्धन पाटील याने सुवर्णपदक तर नाशिकच्या साहिल दुधाने याने कांस्य पदकाची कमाई केली. स्पर्धेतील विजेत्यांना रविवार दि.6 नोव्हेंबर रोजी यवतमाळचे विधान परिषद सदस्य दुश्यंत चतुर्वेदी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रायफल असो.च्या सचिव शिला कानुंगो उपस्थित होत्या.


राज्यस्तरावरील स्पर्धेत बाजी मारलेल्या या सर्व स्पर्धकांची निवड 65 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा दि.17 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत मध्यप्रदेशात भोपाळमध्ये होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE