भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार

मुंबई, दि. 9 :- कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.
या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १० कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे.
आंगणेवाडीमधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्ता, मालवण-बेळणा रस्ता, गोळवण-पोईब रस्ता, ओझर-कांदळगाव मागवणे मसुरे-बांदिवडे-आडवली-भटवाडी रस्ता, राठीवडे-हिवाळे-ओवळीये-कसाल-ओसरगाव रस्ता, चौके-धामापूर रस्ता व कुमामे-नांदोस-तिरवडे-सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंजूर केला आहे.














