आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई (सुरेश सप्रे) : राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांचा त्यांच्या सभासद यांत्रिकी नौकांसाठी लागणाऱ्या हायस्पीड डिझेल तेलाचा पुरवठा करताना 120 अश्वशक्तीवरील इंजिन क्षमता असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा व मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती (डिझेल परतावा) बंद करण्यात आला होता. या विरोधात मच्छीमारांनी आणि संस्थांनी जोरदार विरोध केला होता. मात्र नवीन राज्य शासन आल्यावर कोळी महासंघाचे अध्यक्ष भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्या नुसारच शासनाने निर्णय घेतला होता. आज या अधिसूचनेद्वारे १२० अश्वशक्तीवरील क्षमतेच्या नौकांना देखील डिझेलचा पुरवठा आणि डिझेलवर मिळणारे मूल्यवर्धित प्रतिपुर्ती साठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे ५००हून अधिक नौकांचा व्यवसाय सुरळीत केल्याबद्दल कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी आणि सरचिटणीस राजहंस टपके तसेेच भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी शासनाचे आभार मानले आहेत.















