मिलिंद लिंगायत : ढोलकीला बोलकी करणारा कलाकार!

सुप्रसिद्ध ढोलकी तसेच पखवाज वादक मिलिंद यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९९१ रोजी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे झाला. प्राथमिक शिक्षण परशुराम बाल विद्यालय, बुरंबाड येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षण माखजन इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. मिलिंद यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर संगमेश्वर आय.टी.आय.मधून इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला. घरातच पखवाज तसेच तबला बनविण्याचा व्यवसाय असल्याने आणि वडील भजन परंपरेतील असल्याने साहजिकच संगीताची आवड लहानपणापासून होती. ती अधिक वाढत गेली. मिलिंद यांचे मोठे बंधू आनंद हेही उत्तम भजनी बुवा आहेत. त्यांनी तबल्याचे प्राथमिक शिक्षण चिपळूण येथील महेशकुमार देशपांडे यांचेकडे घेतले. तर पखवाज वादनाचे शिक्षण रत्नागिरी येथील परशुराम गुरव गुरुजींकडे झाले. मुंबई येथील पं. राजाराम जामसंडेकर यांच्याकडे घेतले.

आजपर्यंत पं. शौनक अभिषेकी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा, शरद बुवा घाग अशा दिग्गज गायक कलाकारांना मिलिंद यांनी साथसंगत केली आहे. मिलिंद यांनी सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर आयोजित "ढोलकी झाली बोलकी" स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे सारेगमप लिटिल चॅम्प फेम युवा गायक प्रथमेश लघाटे यांच्या "प्रथम स्वर" या युट्युब चॅनेलसाठी व मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांच्या "मर्म बंधातली ठेव" या कार्यक्रमासाठी मिलिंद पखवाज व ढोलकी साथ करतात. अनेक ठिकाणी त्यांनी तबला, पखवाज व ढोलकी वादनाच्या विविध स्पर्धांमध्ये घेतला आहे. जिल्हा तसेच राज्यस्तरीय अनेक भजन स्पर्धांमध्ये पखवाज वादनासाठी पारितोषिके मिळवली असून त्यापैकी उल्लेखनीय पारितोषिके पुढील प्रमाणे :

▪️हुपरी, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय ढोलकी वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक.
▪️ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत उत्कृष्ट पखवाज वादनाचे पारितोषिक.

माहिती संकलन : दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE