मुरुडमधील साई रिसॉर्टच्या बेसमेंटमधून थेट समुद्रात गटार नेल्याचा सोमय्या यांचा आरोप
मुंबई : दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट जे महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे, ते 25 कोटींचे रिसॉर्ट परब यांनी केवळ एक कोटीला विकल्याचा आणखी एक सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केला आहे.
अवैधरित्या बांधण्यात आलेले हे रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते सोमय्या यांनी जंग जंग पछाडले आहे. या रिसॉर्ट विरोधात सोमय्या यांनी विविध पुरावे सादर केल्यानंतर शासनाकडून या रिसॉर्ट विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी बांधण्यात आलेले हे रिसॉर्ट महाविकास आघाडीतील तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप सोमय्या यांनी वारंवार केला आहे. साई रिसॉर्ट लवकरच जमीन दोस्त होईल, असे सोमय्या यांनी नुकतेच मुरुड भेटीची दरम्यान सांगितले आहे.
दरम्यान, किरीट स्वामी यांनी ट्विटरवर साई रिसॉर्ट संदर्भात आणखी एक मोठा आरोप केला आहे. 25 कोटी रुपयांचे हे रिसॉर्ट अनिल परब यांनी केवळ एक कोटी रुपयांना विकले, असल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार या रिसॉर्टच्या बेसमेंटमधून सांडपाणी निचाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता थेट समुद्रात गटाराचे पाणी सोडण्यासाठी भुयारी गटार खोदण्यात आले आहे, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्या संदर्भातील फोटोग्राफ्स देखील सोमय्या यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
त्यामुळे परबानो हिशोब तर द्यावा लागणारच, असे किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब यांना सुनावले आहे.



















