सिमूरगव्हाणला उत्साहात दत्तजयंती सोहळ्याचे औचित्य
परभणी, दि. ९:- रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे परभणी जिल्ह्यातील सिमुरगव्हाण (ता. पाथरी) येथे श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमातर्गत मराठवाड्यातील १८ शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले.
नाणीज संस्थानच्या मराठवाडा पिठातर्फे या सपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते श्री दत्ताची विधिवत पूजा केली, दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी ६ पासून दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होती.
सायंकाळी मुख्य कार्यक्रमात संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील १८ शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले. त्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन शाळांची निवड करण्यात आली होती. उपस्थित नामवंतांच्या हस्ते हे वाटप झाले.
यावेळी सिमुरगव्हाणचे सरपंच विष्णू उगळे, जी.प. चे माजी सदस्य चंद्रकांत उगळे, दादासाहेब टेंगशे व भावनाताई नखाते, पाथरी पोलीस निरीक्षक गणेश राहिर आदी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या भाषणात संस्थानच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
रात्री पिठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रवचने झाली. त्यांनी श्री दत्तात्रेय यांच्या वैशिष्टयांची ओळख करून दिली. सद्गुरूंचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व सांगितले. सद्गुरू आपले मन संतुलित ठेवतात. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे असते, असे ते म्हणाले. त्यानंतर चरण दर्शनानंतर सोहळ्याची सांगता झाली.
सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भव्य मंडपही अपुरा पडला. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


















