पोरबंदर-कोचुवेलीसह जामनगर तिरुनेलवेली विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या पोरबंदर -कोचुवेली तसेच जामनगर -तिरूनेलवेली या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा डिझेल इंजिनवरील प्रवास आता संपणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह चालवण्याचे रेल्वेचे धोरण आहे. यानुसार ‘कोरे’ मार्गे धावणाऱ्या या आणखी दोन एक्सप्रेस गाड्या विद्युत ट्रॅक्शनवर चालवल्या जाणार आहेत. यातील एक एक्सप्रेस गाडी गुरुवारपासून विजेवर धावू देखील लागली आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोरबंदर -कोचुवेली (20910/20909) ही लांब पल्याची एक्सप्रेस आज दिनांक 22 डिसेंबरपासून विजेवर जावे लागले आहे. उलट देशाच्या प्रवासात ही गाडी कोचुवेली येथून पोरबंदर साठी धावताना दिनांक 25 डिसेंबर पासून विद्युत इंजिन सह चालवली जाईल.
जामनगर -तिरुनेलवेली (19578/19577) एक्सप्रेस देखील आता डिझेल ऐवजी विजेवर जाणार आहे. जामनगर ते तिरुनलवेली या प्रवासात ही गाडी दिनांक 23 डिसेंबर पासून तर विरुद्ध देशाच्या प्रवासात ही गाडी 26 डिसेंबरपासून विद्युत इंजिन जोडून धावणार आहे.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी आधी मालगाड्यांची विद्युत शक्तीवर वाहतूक सुरू झाली तर आता या मार्गे धावणाऱ्या सर्वच प्रवासी गाड्या देखील विद्युत इंजिन जोडून चालवल्या जाणार आहेत. आता अवघ्या काही प्रवासी गाड्याच डिझेल इंजिन जोडून धावत आहेत. त्या देखील विद्युत इंजिन उपलब्ध झाल्यानंतर डिझेल ऐवजी विद्युत इंजिन वर चालवल्या जाणार आहेत.














