विद्यार्थ्यांची बालवयातील कला जतन करणे अभिनंदनीय!

पैसा फंड प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव

संगमेश्वर : विद्यार्थ्यांची कला त्यांच्या बालवयात जतन करणे खूप महत्वाचे असते. बालवयात मुलांच्या विचारांची झेप कल्पनाशक्ती पलीकडील असल्याने त्यांच्या अंतर्मनातून उमटणारा एखादा विषय हा भल्याभल्यांना अंतर्मुख करणारा असतो. बालकलेचे महत्व ओळखून संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा संग्रह करण्याचा उपक्रम हाती घेतला प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते २३ व्या कलासाधना चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करण्यात आले.

प्रशालेत ध्वजारोहण करताना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये आणि मान्यवर.
प्रजासत्ताकदिनानिमित्त लेझीम नृत्य सादर करताना प्रशालेच्या विद्यार्थीनी. (छाया : मिनार झगडे)

सन २००० साली कलासाधना हा चित्रकला वार्षिक तयार करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांच्याच संकल्पनेतून सुरु करण्यात आला. चित्रकलेतील विविध विभागांची आवड असणारे विद्यार्थी वर्षभरात ज्या कलाकृती तयार करतात त्यातील उत्तम कलाकृतींची निवड करुन कलासाधना हे चित्रकला वार्षिक तयार केले जाते. वर्षभर कला अभ्यासक्रमांतर्गत काम करीत असतांना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेतून त्यांच्या हातून उत्तमोत्तम कलाकृती निर्माण व्हाव्यात याच बरोबर ग्रामीण भागातील हे बालकलाकार भविष्यात उच्च कलाशिक्षण घेण्यासाठी शहरांत गेले तर , तेथील स्पर्धेत ते टीकावे किंबहुना पुढे जावेत हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे मुख्याध्यापिक सचिनदेव खामकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

कलासाधना चित्रकला वार्षिक मधील कलाकृती एवढ्या सुंदर आहेत की, त्या प्रशालेतील चिमुकल्या हातांनी रेखाटलेल्या असतील असे वाटतच नाही. प्रशालेकडे बाराशे कलाकृतींचा संग्रह होणे, ही शाळा आणि संस्थेला अभिमानाची बाब असल्याचे मत संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांनी या चित्रकला वार्षिक प्रकाशनानंतर बोलतांना व्यक्त केले . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी कलासाधना मधील चित्र आवर्जून पाहावी असे आवाहन सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी केले.

कलासाधना या बालकलाकारांच्या चित्रकला वार्षिकचे प्रकाशन करतांना संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, संस्था सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे ,रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर दिसत आहेत

विद्यार्थ्यांची कला ही एखाद्या तज्ञ कलाकारालाही कधीकधी अंतर्मुख व्हायला लावते . बालकलाकारांच्या अंतर्मनातील भावविश्व ते कलेतील सर्व मर्यादा नियम ओलांडून अत्यंत निरागसपणे आपल्या कलाकृतीतून दृष्य रुपात आणत असतात . प्रसंगी बालकला समजणेही अवघड जाते . यासाठी बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतीत काम करतांना नियमांच्या चौकटीत बांधून न ठेवता मोकळेपणाने काम करायला दिल्यास कागदावर त्यांच्या मनातील खरे आकार आणि रंग उमटतात . यातूनच आश्चर्यकारक चित्रे तयार होतात . पैसा फंडचा कलासाधना हा उपक्रम अशा कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामुळेच येथील असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात आपली उल्लेखनीय प्रगती करीत आहेत . – विष्णू परीट, चित्रकार.

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे, समीर शेरे, बाबा नारकर , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE