स्वर निहाली मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध !

ऐतिहासिक नगरी कसबा येथे श्री गजानन महाराजांच्या उत्सवात गायन सेवा

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक नगरीत मधुरा प्रसाद फाटक यांच्या निवासस्थानी संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्ताने स्वर निहाली हा निहाली गद्रे हिचा संगीत मैफलीचा अप्रतिम असा कार्यक्रम गायन सेवा म्हणून सादर केला. या संगीत मैफिलीत सुरांची अक्षरशः उधळण झाल्याची भावना श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केली. निहालीच्या संगीत मैफिलीसाठी पंडित राम मराठे यांचे चिरंजीव शास्त्रीय संगीत गायक संजयदादा मराठे हे विशेष उपस्थित होते.

संगीत मैफिलीला निवेदन कसे मोजक्या शब्दात आणि अर्थपूर्ण असावे , याचा उत्तम नमुना निहालीची आई  दिप्ती अभय गद्रे यांनी यावेळी सादर करुन कार्यक्रमाच्या आरंभीच श्रोत्यांची मने जिंकली . गीतांना धरुन केलेले निवेदन गाण्याविषयीची आसक्ती अधिक वाढवत होते.

तु सुखकर्ता या गीताने निहालीने आपल्या गायन सेवेला प्रारंभ करुन प्रथमच जणू साक्षात श्री गजाननांचे आशीर्वाद प्राप्त केले . यामुळे पुढील सारी गीते चैतन्यमयी झाली . कौसल्येचा राम हे गीत गाताना सर्वांनी  ‘ राम राम ‘ असा जणू जपच सुरु केला . अबीर गुलाल उधळीत रंग या पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अभंगात तर निहालीने श्रोत्यांवर सुरांचा जणू अभिषेक केला आणि प्रकट दिनानिमित्त निहालीने साक्षात गजानन  महाराजांवर सुरांचा अभिषेक करुन आपली सेवा खऱ्या अर्थाने रुजू केली. अबीर गुलाल या अभंगात तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी ‘ वन्स मोअर ‘ प्राप्त झाला आणि या या अभंगाचे एक कडवे श्रोत्यांसाठी सादर केले .

साथीला असणाऱ्या हार्मोनियम वरील माभळे – संगमेश्वर येथील सुमेध सावरकर याची संवादिनीवरील बोटे गजानन महाराज मंदिरासमोर जादूवत फिरत होती . निहालीच्या सुरांसोबत सुमेधची संवादिनी श्रोत्यांजवळ सुरांमधून संवाद साधत असल्याचा साक्षात्कार होत होता . तबला विशारद झालेला कसबा येथील किरण लिंगायत हा तबल्यामधील एक आशेचा किरण पहातापहाता आज मोठमोठ्या मैफिलींना तबल्याची साथ करत आपल्या तबल्याच्या बोलांनी एक किरण राहीला नसून मैफिल प्रकाशम करणारा एक जादुई कलाकार बनल्याची चुणूक प्रेक्षकांना पहायला मिळाली.

बाजेरे मुरलीया बाजे …… हे गीत निहालीने ज्यावेळी गायला सुरुवात केली त्यावेळी दुरुन खरोखरच वेळूचे सुर ऐकू येत असल्याची अनुभूती श्रोत्यांना घेता आली . गजानन महाराज प्रकटदिन असल्याने निहालीची गान मैफल परत गजानन महाराजांच्या गीतावर येवून स्थिर होत होती . गणगण गणात बोते जपता जीवन नौका पार करु …….! या गीतावर श्रोतृवृंद तल्लीन होवून डोलू लागला होता . दत्तगुरु ही एक उर्जा आहे , भक्तांमधील भक्तिभाव ज्यावेळी फळाला येतो त्यावेळी भक्त देखील माझे पूण्य फळा आले ……. असे गावू लागतो. निहालीने दत्तगुरुंचे हेच गीत आपल्या सुरेल आवाजात गाऊन साऱ्या भक्तांच्या हृदयातील आवाज ऐकल्याची उपस्थित भक्तांना जाणीव करुन दिली.

संगीत मैफिल म्हटली की , नाट्यगीताची अपेक्षा श्रोते करीतच असतात . श्रोत्यांची एका नाट्यगीतासाठी आलेली फर्माइश निहालीने प्रथम ‘ राधाधर मधु मिलींद जय जय ……! रमारमण हरि गोविंद…..!! या नाट्यगीतात श्रोते रममाण झाले . जयशंकरा गंगाधरा ……! गौरी हरा ……. या नाट्यगीताला निहालीने सुरुवातीचा जो आलाप लावला त्यातच रसिक गुंग झाले.

संगीत ही एक तपश्चर्या आहे , हे निहालीच्या गुरु मुग्धा भट सामंत या नेहमीच सांगतात असे आपल्या निवेदनात दिप्ती गद्रे यांनी नमूद केले. त्यानुसार निहाली संगीताचा दररोजचा सराव एक तपश्चर्या समजून करत असल्यानेच ती कमी वयात संगीतातील अलंकार पदवी पाप्त करु शकल्याचे दिप्ती गद्रे यांनी यावेळी नमूद केले. सोहं हर डमरु बाजे …….!  गीतानंतर श्रोत्यांच्या टाळ्या जणू डमरु सारख्या वाजल्या आणि निहालीने रसिकांची मने जिंकली. कानडा राजा पंढरीचा या अभंगाने निहालीने संगीत मैफिलीचा अखेरचा टप्पा गाठला . या अभंगामुळे श्रोत्यांना आपण वारकरी झाल्याची अनुभूती घेता आली. टाळ्यांच्या गजरात साऱ्यांनी विठ्ठल विठ्ठलचा गजर केला. संपूर्ण मैफिलीसाठी झांज साथ करणाऱ्या आणि आरतीच्या प्रसंगी तबला साथ करणाऱ्या स्वरदा ढोल्येचे महाविद्यालयीन तरुणीचे यावेळी दिप्ती गद्रे यांनी कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. अच्युता …… देवा पांडुरंगा…….! या भैरवीने निहालीने गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यासाठी केलेल्या संगीत सेवेची सांगता केली .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE