- अदानी आणि रिलायन्सचा महाराष्ट्र सरकारसोबत मोठा करार!
मुंबई: महाराष्ट्रात स्वच्छ आणि हरित ऊर्जेला (Clean Energy) मोठी गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत, राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने देशातील आघाडीच्या कंपन्यांसोबत अणुऊर्जा निर्मितीसाठी (Nuclear Energy) महत्त्वाचे सामंजस्य करार (MoU) केले आहेत.
या ऐतिहासिक करारामध्ये अदानी पॉवर (Adani Power), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि एनटीपीसी (NTPC) या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
३ मोठ्या प्रकल्पांचे सविस्तर तपशील (गुंतवणूक आणि रोजगार)
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हे भव्य प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. अदानी पॉवर लिमिटेड (बारसू, रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे अदानी पॉवर आणि त्यांची उपकंपनी ‘कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड’ मिळून भव्य अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत.
- प्रस्तावित क्षमता: ६,००० मेगावॅट (MW)
- एकूण गुंतवणूक: ₹१,५०,००० कोटी
- रोजगार संधी: एकूण १२,००० (४,५०० प्रत्यक्ष + ७,५०० अप्रत्यक्ष रोजगार)
२. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्णगड, रत्नागिरी)
रिलायन्स इंडस्ट्रीज रत्नागिरीतील पूर्णगड येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘भारत स्मॉल रिॲक्टर्स’ किंवा स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR) प्रकल्प उभारणार आहे.
- प्रस्तावित क्षमता: २ X २२० मेगावॅट ते ६ X १२०0 मेगावॅट
- एकूण गुंतवणूक: ₹८,००० कोटी ते ₹२,००,००० कोटी
- रोजगार संधी: एकूण १,०३,००० (३,००० प्रत्यक्ष + १,००,००० अप्रत्यक्ष रोजगार)
३. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ – NTPC (देवगड, सिंधुदुर्ग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे सरकारी मालकीची कंपनी ‘एनटीपीसी’ (National Thermal Power Corporation) अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
- प्रस्तावित क्षमता: ४,००0 ते ७,२०० मेगावॅट (एकूण ६ युनिट्स)
- एकूण गुंतवणूक: ₹१,००,००० कोटी
- रोजगार संधी: ५,००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार
“स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्रात येणारी ही अब्जावधी रुपयांची गुंतवणूक देशाला समृद्ध ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देईल. राज्यात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल.”
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
बैठकीला कोणाची होती उपस्थिती?
या महत्त्वपूर्ण बैठकीला पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक ए. पी. सामल, अदानी पॉवरचे बिझनेस हेड विवेक शर्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यूक्लिअर एनर्जी बिजनेसचे अध्यक्ष रंजय शरण यांनी उपस्थित राहून करारावर स्वाक्षऱ्या केल्या.













