चिरनेर गावापर्यंत एनएमएमटी बस सेवा सुरू करावी

भारतीय जनता पार्टीची निवेदनाद्वारे मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरण मधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा (NMMT )च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबई मधून अनेक प्रवाशी NMMT च्या बसने उरण मध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोली पर्यंत येत असतात. मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना NMMT च्या बससेवेचा फायदा मिळत नाही.त्या अनुषंगाने जुईनगर ते चिरनेर अशी बससेवा सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी मार्फत NMMT प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सततच्या वाढत्या इंधन दर वाढीमुळे तसेच सीएनजी वाढीमुळे भविष्यात इलेक्ट्रिक बस चे प्रमाण वाढणार असून त्याचा फायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे त्याच बरोबर नागरिकांचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशांची बचत देखील होईल. अशीच बस सेवा जुईनगर ते चिरनेर येथे सुरू करण्यासाठी दिनांक ११ मे 2022 रोजी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते अरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते वसंत भोईर ,संतोष गायकवाड यांनी एनएमएमटी चे प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन जुईनगर ते चिरनेर गावापर्यंत बस सेवा चालू करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.लवकरच बस सेवा चिरनेर गावापर्यंत चालू करण्याचे आश्वासन अधिकार्‍यांकडून देण्यात आले आहे.या इलेक्ट्रिक वातानुकूलित एनएमएमटी चा फायदा गावातील वयोवृद्ध, दिव्यांग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी सर्वांना होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE