उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. हँडब्रेक न लावता उतारावर ट्रेलर उभा करणे एका चालकाच्या जिवावर बेतले आहे. स्वतःचाच ट्रेलर अंगावरून गेल्याने ३२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चालकाचे नाव बृजभान मुन्डा यादव (३२) असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भीतरी येथील रहिवासी होता. तो उरण परिसरात ट्रेलर चालक म्हणून काम करत होता.
सोमवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास बृजभान हा आपला ट्रेलर (क्रमांक MH-46-BU-4299) घेऊन जेएनपीटीकडून पनवेलच्या दिशेने जात होता. धुतुम येथील IOTL कंपनीशेजारील ब्रीजवर गाडी आल्यावर त्याने उतारावरच ट्रेलर थांबवला. मात्र, खाली उतरताना त्याने ट्रेलरचा हँडब्रेक लावला नव्हता.
सावधगिरीचा अभाव अन् काळाचा घाला
ट्रेलरमध्ये अवजड कंटेनर भरलेला असल्याने आणि रस्ता उताराचा असल्याने, बृजभान खाली उतरून समोर जाताच वजनामुळे ट्रेलर अचानक पुढे सरकला. काही कळायच्या आतच तो धावत्या ट्रेलरखाली चिरडला गेला. यात तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- दाखल कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल.
- तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













