चिपळूण : गुहागर तालुक्यातील खालची शीर येथील आबलोली रस्त्यालगतच्या शेतात दोघे तरुण अपघातग्रस्त दुचाकीसह बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून या दोघांना आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. बेशुध्द असलेल्या दुसऱ्या तरुण उपचारादरम्यान शुध्दीवर आल्यावर मृताची ओळख पटविण्यात आली.

चिपळूण तालुक्यातील कादवड येथे राहणारा शैलेश सुनील जाधव (२०) आणि रोहीत दीपक निकम (१९) हे दोन तरुण शुक्रवारी पहाटे 4 वाजता दुचाकीने (एमएच 08 यू 2356 ) तवसाळकडे निघाले होते. तवसाळला आंबा काढणीचे कामासाठी चालले होते. सकाळी 6 च्या सुमारास ते शीर येथे आले. खालची शीर येते आबलोली रस्त्यावर एक तीव्र वळण आहे. या वळणात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात शिरले. तेथे काजुच्या झाडाच्या फांदीवर आदळून दोघेही बेशुध्द पडले. अपघातात नंतर जवळपास अर्धातास हे तरुण बेशुध्दावस्थेत होते. 6.30 च्या सुमारास ग्रामस्थांनी हा अपघात पाहून पोलीस ठाण्यात खबर दिली. तातडीने गुहागरचे पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी शैलेश आणि रोहीतला बेशुद्धावस्थेतच आबलोली आरोग्य केंद्रात नेले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी शैलेश सुनील जाधव याला मृत घोषीत केले तर रोहीत निकमवर उपचार सुरु केले.














