‘कोरे’ मार्गाने धावत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहत बसणे राजापूरवासियांच्या नशिबी!

राजापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणात रेल्वे आणण्यासाठी ज्या तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावली त्या राजापूर मतदारसंघातील रेल्वे स्थानक आणि प्रवासी जनतेच्या सोयी सुविधांबाबत रेल्वेला विसर पडला आहे. ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे सेवा लांबणीवर पडलेली वंदे भारत एक्सप्रेस देखील राजापूरवासीय जनतेला केवळ पाहत बसावी लागणार आहे. गाड्यांना थांबे देण्याच्या बाबतीत राजापूरवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने राजापूरवासीय प्रवासी जनतेने व्यक्त केल्या आहेत.

कोकणात रेल्वे यावी म्हणून तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने संसदेत महत्वाची भूमिका बजावली त्या राजापूरवर मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने अन्यायच  केला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसला राजापुरात थांबा नाकारून तालुकावासीच्या पदरी घोर निराशा पडली आहे. यामुळे ‘कोरे’ मार्गावरुन धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस पहाणे एवढेच तालुकावासीयांच्या नशीबी आले आहे. दरम्यान राजापूर स्थानकात वंदे भारतला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी तालुक्यातुन वाढू लागली आहे.


कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु होणार असून रत्नागिरी आणि खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबे मंजुर करण्यात आले आहेत. राजापूरकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.
कोकणात रेल्वे यावी म्हणून पार्लमेंटमध्ये सातत्याने आवाज उठविणारे तत्कालीन खासदार बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते व त्यानंतर रेल्वेमंत्री म्हणुन कोकण रेल्वेला चांगले दिवस दाखविणारे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू यांनी ज्या लोकसभा मतदारसंघाच्या नावाने प्रतिनिधीत्व केले त्याच राजापूरच्या नावाने या तालुक्यातील एकमेव असलेल्या राजापूर रोड स्थानकावर मात्र ‘कोरे’ प्रशासनाने अन्यायच केला आहे, अशी भावना राजापूरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे

मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी आणि तुतारीसह दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस याच गाड्याना राजापुरात थांबे आहेत. हे वगळता दक्षीणेसह दिल्ली, गुजरात, उत्तराखंड, पंजाब राजस्थान आदी भागांकडे जाणाऱ्या गाड्यानना येथे अजूनही थांबे देण्यात आलेले नाहीत. हंगामी काळात कोरे मार्गावर ज्या नवीन गाड्या सोडल्या जातात त्या गाड्यानना अपवादानेच राजापूरात थांबे दिले जातात, हे गेल्या काही वर्षातील राजापूर रोड स्थानकाचे चित्र आहे.

जिल्ह्यत केवळ राजापूर तालुका वगळता उर्वरीत तालुक्यांतील पोस्टात रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा यापूर्वीच देण्यात आल्या आहेत केवळ आणि केवळ राजापूरवरच अन्याय होत आला आहे आणि आता देशात सध्या जोरदार बोलबाला असलेल्या आणि सर्वांचे खास आकर्षण ठरलेली वंदे भारत ही ट्रेन या मार्गावर सुरु होत आहे. काही अडचणीमुळे ती अजून सुरु झाली असली तरी लवकरच ती सुरू होत आहे. गाडीला जिल्ह्यात रत्नागिरीशिवाय खेडला थांबा देण्यात आला आहे त्यामुळे त्या परिसरातील रेल्वे प्रवाशांत उत्साह संचारला असतानाच जिल्ह्यात चिपळूणसह राजापूरला थांबे नसल्याने या तालुक्यातील जनता प्रचंड नाराज झाली आहे.


यामुळे आपल्या भागातुन धावणारी वंदे भारत ही गाडी बघण्याचे काम आता करावे लागणार आहे. ही धावणारी गाडी राजापूरात थांबणार कधी ? असे खोचक व तेवढेच संतप्त सवाल आता जनतेतुन विचारले जावू लागले आहेत .
विस्ताराने फार मोठा असलेल्या राजापूर तालुक्यासाठी राजापूर हे एकमेव परिपूर्ण रेल्वेस्थानक आहे तर सौदळ हे हॉल्ट स्टेशन आहे. तालुक्यातील महत्वपूर्ण अशा या स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्यान्ना थांबे मिळणे अवश्यक आहे. कारण देशाच्या कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलांगणा, केरळ गुजरात आदी राज्यातुन तालुक्यात उदरनिर्वाहासाठी येत असतात त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यान्ना राजापूरात थांबे मिळणे अपेक्षीत असतानाच कोरे प्रशासनाने मात्र राजापूर रोड स्थानकाकडे दुर्लक्ष करुन अन्यायच केला आहे. ‘कोरे’ मार्गावर नव्याने सुरु होणाऱ्या वंदे भारत गाडीला राजापूरात थांबा देऊन रेल्वे प्रशासनाने राजापूरवरचा अन्याय दूर करावा, अशी मागणी आता जनतेतुन केली जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE