रत्नागिरी : ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे दि. 3 जून रोजी मडगावमध्ये होणारे उद्घाटन रद्द झालेल्या मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायस्पीड अलिशान ट्रेनचा शुभारंभ दि. 27 जूनला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशमधील भोपाळ येथून व्हीडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दिवशी कोकण रेल्वेमार्गे धावणार्या मडगाव-मुंबईसह एकूण पाच वंदे भारत एकस्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे.
असे असेल संभाव्य वेळापत्रक
या संदर्भातील माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही हायस्पीड ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. संभाव्य नियमित वेळापत्रकानुसार मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे 5.25 वाजता सुटेल. दुपारी 1.15 वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी 2.35 वाजता सुटून रात्री 10.25 वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.
कोकणवासीय ज्या बहुचर्चित रेल्वेची प्रतीक्षा करत होते, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी देशभरातील एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मात्र, पंतप्रधानांचा विदेश दौरा याच कालावधीत असल्यामुळे या पाचही गाड्यांच्या शुभारंभाकडे लक्ष लागले आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसचबाबत प्राप्त माहितीनुसार धावण्यासाठी सज्ज असलेल्या मडगाव-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच वंदे भारत एक्स्पेस दि. 27 जूनपासून धावणार आहेत.
या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणार्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होणार आहे. या गाड्यांच्या समावेशामुळे या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयी -सुविधा उपलब्ध होतील, त्यांना आरामदायी आणि आधुनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे.














