रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी केल्यानंतर बुधवार दिनांक 28 जून रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव मार्गावर पहिली नियमित फेरी करणाऱरी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी उद्घाटनाच्या वेळेपर्यंत जवळपास हाऊसफुल्ल झाली होती.
पहिल्या गाडीची केवळ 63 तिकीटे शिल्लक
मुंबई सीएसएमटी -मडगाव मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची दिनांक 28 जून रोजी पहिली फेरी होत आहे. या पहिल्या फेरीसाठी शुभारंभाच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ ६३ तिकीटे शिल्लक राहिली होती. म्हणजे पहिली फेरी जवळपास फुल झाली आहे. उरलेली 68 तिकीटे देखील रात्री उशिरापर्यंत बुक होतील अशी स्थिती आहे.
कोकणवासियांना प्रचंड उत्सुकता असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी सकाळी दहा वाजून 58 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
दरम्यान दिनांक 28 जून पासून प्रवाशांसाठी नियमितपणे धावणाऱ्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण सोमवारी खुले होताच पहिल्याच दिवशी येत्या गणेशोत्सवातील चार दिवसांचे आरक्षण फुल्ल झाले. मंगळवारी उद्घाटनापर्यंत यामध्ये आणखी एका दिवसाची भर पडून गणेशोत्सव कालावधीतील एकूण पाच दिवसांच्या आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे या पाच दिवसांसाठी प्रतीक्षा यादीवरील तिकिटे विकण्याची वेळ रेल्वेवर आली आहे.














