अमली पदार्थ विरोधी कार्यक्रमांना रत्नागिरी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

सलाम मुंबई व एमबीबीएस फाउंडेशनचा उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सलाम मुंबई आणि एमबीबीएस तथा मायबाप बालसेवा फाउंडेशन यांच्यातर्फे दिनांक 29 मे ते 29 जून या महिनाभराच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

फाउंडेशनच्या या उपक्रमांमध्ये ‘गाढव तंबाखू खात नाही ‘ पथनाट्य,प्रबोधनात्मक पोस्टर प्रदर्शन, जम्बो आरोग्यदायी साप शिडी या उपक्रमांना जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात सध्या अमली पदार्थाचा विळखा वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून सलाम मुंबई फाउंडेशन राज्यभर कार्यरत आहे तसेच जिल्ह्यामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन मागील दहा वर्षांपासून विविध प्रकारे प्रबोधनाचे काम करीत आहे. जिल्ह्यात नशाजन्य पदार्थांचे सेवन वाढत असतानाच कॅन्सरचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरमधील 93% मृत्यू हे धूम्रपानामुळे होत आहेत तसेच पारंपारिक रित्या तंबाखूचे सेवन करण्याच्या सवयीमुळे तसेच तंबाखूच्या विविध स्वरूपात सेवन केला जात असल्याने तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. तसेच 26 जून या दिवशी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो.

दरम्यान या दोन्ही दिनांचे औचित्य साधून 29 मे ते 29 जून या कालावधीत सलाम मुंबई आणि एमबीबीएस फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन ,पोस्टर्स मेकिंग स्पर्धा, कोप्टा कायदा विषयक माहिती भित्तिपत्रके, पीपीटी ,आरोग्य विषयक व्याख्याने, पथनाट्य प्रचार फेरी ,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणे,विविध शासकीय कार्यालये, वाडी- वस्तीवर जाऊन फाउंडेशनचे कार्यकर्ते तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. तसेच अन्य अमली पदार्थांचा विळखा भावी पिढीला कसा धोकादायक आहे याबाबत जागृती करण्यात आली.

एमबीबीएस फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक एडवोकेट प्रशांत जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातून तंबाखूसह अन्य अमली पदार्थ हद्दपार होण्यासाठी तसेच अन्य अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी आपण हे जागृतीचे कार्य हाती घेतले आहे याला आपल्या फाउंडेशनचे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिकपणे न्याय देत आहेत. प्रौढांबरोबरच युवकांची तंबाखूजन्य पदार्थांची संख्या छुप्या रीतीने वाढत आहे त्यामुळे आपण जिल्ह्यात या अमली पदार्थ विरोधी महिन्याचे आयोजन केले आहे तसेच हा कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून यामधून जिल्ह्याला निश्चितपणे फायदा होईल असे मत एमबीबीएस फाऊंडेशनच्या प्रा.कविता जाधव यांनी सांगितले.

फाऊंडेशनचा हा कार्यक्रम जिल्ह्यासाठी वर्षभर सुरू राहणार असून सध्या आपण नगरपरिषद सिविल हॉस्पिटल, पोलीस स्टेशन्स, एसटी बस स्थानके तसेच अन्य प्रशासकीय कार्यालये कार्यालय ,शाळा रत्नदुर्ग किल्ला यासह अन्य ऐतिहासिक, पर्यटन स्थळे अगदी सुपर स्टार सर्कस सुद्धा अशा विविध ठिकाणी सुरू असलेल्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे याबाबत फाऊंडेशन तर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE