पाणी तुंबण्याचा धोका टाळण्यासाठी निर्णय
चिपळूण : शहराला आणि पेठमाप, गोवळकोट भागाला जोडणारा जुना बाजार पूल पाडण्यास गुरूवार दि.१९ मे पासून सुरुवात झाली आहे. वाशिष्ठी नदीपात्रामध्ये जुना बाजारपूल आहे. या पुलाची कमी उंची लक्षात नदी प्रवाहातून येणारे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे हा जुना बाजार पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुना बाजार पूल पाडण्याच्या कामाची सुरुवात गुरूवारपासून करण्यात आली. येत्या काही दिवसात हा पूल तोडून त्यावरची जलवाहिनी नवीन पुलावर जोडण्यात येणार आहे. या कामाची पाहणी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, अभियंता परेश पवार यांनी केली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपविभागीय अभियंता राजेंद्र तांबे, उपअभियंता व्ही. व्ही . साळुंखे यांनी काही भागात पाहणी केली. तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी उक्ताड येथील गाळ काढण्याच्या कामाचीही पाहणी केली.
उक्ताड बेटाचा काढलेला गाळ लवकरात लवकर हलवावा, अशा सक्त सूचना तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी जलसंपदा विभागाला केल्या आहेत.