धोकादायक साकव, दरडप्रवण गावांचे सर्व्हेक्षण करा : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.22 (जि.मा.का.) : प्रत्यक्ष स्थळी जावून, गावाला भेट देवून अधिकाऱ्यांनी धोकादायक साकव आणि दरड प्रवण गावांचे सर्व्हेक्षण करावे. एक अधिकारी काय करु शकतो याचे उदाहरण रायगडचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी कृतीतून दाखवून दिलय. लोकांच्या कल्याणासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.


पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली. बैठकीला आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. अपर जिल्हाधिकारी शुंभागी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.यात 2011 ते 2023 मधील सरासरी पर्जन्यमान, 17 ते 21 जुलै दरम्यानचे पर्जन्यमान, गेल्या वर्षातील पाऊसमान, प्रमुख नद्यांची पाणी पातळी, तालुकानिहाय स्थलांतरण, नुकसान, रस्ते, मदत आदींचा समावेश होता.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जलसंपदा विभागाने जगबुडीचा गाळ काढण्यासाठी तात्काळ नाम फौंडेशनला पत्र द्यावे. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दरड प्रवण भागातील गावांची यादी बनवताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावाला भेट देवून माहिती घ्यावी. तसेच धोकादायक, ना दुरुस्त साकवांच्या बाबतीतही माहिती घ्यावी. खेडमधील ज्या भागात अद्याप वीज बंद असेल तेथे महावितरणने जलदगतीने कामकाज करुन ती पूर्ववत करावी.
लोकांच्या हिताच्या कामासाठी, आवश्यक तो निधी देवू. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करावीत, असेही ते म्हणाले.कृषी, आरोग्य, जलसंपदा, बांधकाम विभागाचा त्यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला.
आमदार श्री. कदम यांनीही यावेळी साकवबाबत सूचना केल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार मानले.


जलसंपदा अपर मुख्य सचिवांना फोन
पालकमंत्री श्री. सामंत यांनी बैठकीमधूनच जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला. रत्नागिरी जिल्हयातील धरणांबाबत सर्व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या स्तरावर आढावा बैठक घेण्याबाबत त्यांनी सूचना केली.

एक अधिकारी काय करु शकतो…


बैठकीच्या सूरुवातीलाच पालकमंत्री श्री. सामंत यांनी अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारा रायगडमधील अनुभव सांगितला. ते म्हणाले, इर्शाळगड दुर्घटनेबाबत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी मला दुर्घटनेबाबत तात्काळ कळवून त्यांनी घटनास्थळी चालायला सुरुवातही केली होती. तासाभरानंतर पोहचून व्हीडीओ कॉलद्वारे माहिती देत असताना पुन्हा दरड कोसळली. त्यांच्यासोबत तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि सहा-सात जणांनी तात्काळ रेस्कू ऑपरेशन सुरु केले.
श्री. नैराळे हे काल खाली उतरले. एनडीआरएफ देखील घटनास्थळी पोहचले नव्हते, त्यावेळी धाडस करुन ते तेथे पोहचले. एक अधिकारी काय करु शकतो याचा अभ्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावा असे सांगून त्यांनी त्यांचे कौतुक केले.

  • ▶️ नैसर्गिक आपत्तीची बैठक असल्याने पालकमंत्र्यांनी स्वागताचा पुष्पगुच्छ नाकारला.
  • ▶️ आजारी असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड येथे पोहचल्याचा पालकमंत्र्यांकडून उल्लेख.
  • ▶️ पत्रकारांनी सूचविलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सक्त सूचना.
  • ▶️ मिरजोळे गावात भेट देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
  • ▶️ उद्यान सुशोभिकरणाबाबत रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE