मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ अभय पाध्ये यांचे निधन

संगमेश्वर दि. २९ ( प्रतिनिधी ): निवृत्त बॅंक कर्मचारी आणि मौजे असुर्डे येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ अभय यशवंत पाध्ये ( ६४ ) यांचे सांगली येथील इस्पितळात औषधोपचार सुरु असताना शुक्रवार २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता दु:खद निधन झाले त्यांच्या अकाली निधनामुळे मौजे असुर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

अभय यशवंत पाध्ये हे बॅंक कर्मचारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे मुंबई येथे एका बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. मुंबईहून गावी आल्यानंतर गावातील विविध सामाजिक कार्यात भाग घेऊन गावचे पौराहित्य देखील सांभाळले. अभय यांना गायनाची आवड असल्याने विविध कार्यक्रमात ते हौशी गायक म्हणून गायन करत असत. विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी घरानजिक असणाऱ्या पिढीजात विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात वडिल यशवंत पाध्ये यांच्या सहकार्याने प्रमुख भूमिका पार पाडली होती येथील एकादशीचा उत्सव प्रसिध्द समजला जातो. एक मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून अभय पाध्ये यांची जनमानसात ओळख होती.

वीस दिवसांपूर्वी अभय पाध्ये यांना ताप येवू लागल्याने तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने ते सांगलीस्थित मुलगा अमित याच्याकडे विश्रांती आणि अधिक उपचार करुन घेण्यासाठी गेले होते . सहा दिवसांपूर्वी त्यांना श्वास घ्यायला त्रास होवू लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री ८ वा. त्यांची प्राणज्योत मालवली . आज सांगली येथील स्मशानभूमीत दुपारी १ : ३० वा. त्यांच्यावर दु:खद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मौजे असुर्डे , कसबा – संगमेश्वर , राजापूर , चिपळूण, रत्नागिरी, सांगली आदी ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित होते. अभय पाध्ये यांच्या पश्चात वडिल यशवंत पाध्ये ( ९४ ), पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE