प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते. चित्रपट कलाक्षेत्रात
भव्यता दिव्यता व ऐतिहासिक कलेच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टी व सांस्कृतिक क्षेत्रात देशभरातून नावाजलेले महाराष्ट्राचे सुपुत्र कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं वृत्त धक्कादायक आहे.
दिल्लीतील स्वातंत्र्यदिनानिमित्त पथसंंचालनात महाराष्ट्राची सांस्कृतिक जगासमोर मांडली
दिल्लीमध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे दर्शन मोठ्या दिमाखात जगासमोर मांडणारे म्हणून कायम त्यांचा अभिमान राहिला.
त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ ला ठाण्यात जन्मलेल्या नितीन यांचे बालपण मुंबईत आणि कोकणात गेले. दापोलीजवळ पाचवली गावातील निसर्ग त्यांच्यातील कलाकाराला घडवण्यास कारणीभूत ठरला. शालेय शिक्षण झाल्या नंतर त्यांनी जे.जे. व रहेजा या कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे कलादिग्दर्शनाचे धडे गिरवले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘तमस’, ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’ यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘परिंदा’, ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटांसाठीही त्यांनी नितीशदांना साहाय्य केले. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले. या चित्रपटातील भव्य सेट्सनी सर्वांचे डोळे दिपवून टाकले आणि नितीन देसाई या नावाची जादू सगळीकडे पसरायला सुरुवात झाली. ‘खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलिवूडपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला. कलादिग्दर्शनामध्ये यश मिळाल्यानंतर देसाई यांनी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटाचीही निर्मिती केली. ‘अजिंठा’ चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात उतरले.