डॉ. दर्शना कोलते यांच्या ‘जगणंच गाणं व्हावं’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कसाल : कविता हा कमीत कमी शब्दांत मोठा आशय सांगणारा वाङ्मय प्रकार. संवेदनशील मनातून उत्कटतेने येणारा आविष्कार म्हणजे कविता, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका वृंदाताई कांबळी यांनी केले. कवयित्री डॉ. दर्शना कोलते यांचा पहिला काव्यसंग्रह ‘जगणंच गाणं व्हावं’ याचा प्रकाशन सोहळा नुकताच कसाल येथील साई माऊली बँक्वेट हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमावेळी अध्यक्षीय भाषणात कांबळी बोलत होत्या.
कोमसापचे माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ कवी आनंद वैद्य यांनी भविष्यातली कविता कशी असावी, याचा मागोवा घेतला. लेखक, साहित्यप्रेमी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षीय भाषणात कांबळी म्हणाल्या, सध्याच्या निबंधांसारख्या लिहिल्या जाणार्या गद्य कवितांच्या गर्दीत डॉ. दर्शना कोलते यांची कविता स्वतःचे वेगळेपण जाणवून देते आणि म्हणूनच ती रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कवी प्रभाकर सावंत आणि डॉ. हर्षदा देवधर यांनी कवितांचे सुंदर अभिवाचन केले.
डॉ. नीलेश कोदे यांच्या निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रशांत कोलते यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळचे सदस्य, रोटरी क्लबचे सदस्य, साहित्यप्रेमी, डॉक्टर्स, कसाल येथील वाचनप्रेमी यावेळी उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यावेळी पुस्तकविक्रीमधून जमा झालेली रक्कम जि. प. शाळा कुसबे येथे शालोपयोगी साहित्यासाठी वापरण्यात येणार आहे.