कळंबुसरे येथील महिलांसाठी माण देशी उद्योगिनी म्हसवड प्रशिक्षण केंद्राकडून व्यवसाय प्रशिक्षण
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील महिलांसाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ प्रमाणित शाखा कामोठे माणदेशी उद्योगिनी म्हसवड यांच्याकडून महिलांसाठी व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आज महिला प्रत्येक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येत आहेत. त्यातच संसाराच्या प्रपंच्यातून वेळ काढून व्यवसाय करून त्यांनी देखील आर्थिक साक्षर व्हायला पाहिजे.कारण महागाईचा भस्मासुर पाहता प्रत्येक महिलेने व्यवसायिक व्हायला पाहिजे असा उद्देश माण देशी उद्योगिनी म्हसवड प्रशिक्षण केंद्राचे असून या दृष्टीकोणातून हे प्रशिक्षण कळंबूसरे गावात घेण्यात आले.
या फाऊंडेशनचे संस्थापक चेतना गाला सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपन्न झाले. सदर प्रशिक्षणास गावातील महिला उपस्थित होत्या. या प्रशिक्षणात रव्याच्या शेवई चक्की मध्ये तयार करून प्रत्यक्षात दाखविण्यात आल्या. माण देशी उद्योगिनी फाउंडेशन कडून महिलांसाठी अनेक कोर्स असून त्यात प्रामुख्याने मेणबत्ती, अगरबत्ती, अत्तर, वॉशिंग पावडर, मेहंदी कोन, केक, बिस्किट,आइस्क्रीम, ज्वेलरी, साबण ईत्यादी तयार करण्याचे 50 कोर्स उपलब्ध आहेत. कळंबुसरे गावातील महिलांसाठी मे महिन्याचा शेवटी पुन्हा प्रशिक्षण आयोजित होणार असून कळंबुसरे गावातील कार्यक्षम महिला रणीता उमेश भोईर यांनी गावातील महिलांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.