प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर १ व २ जून रोजी शिर्डीमध्ये
देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू: बाळासाहेब थोरात
मुंबई :अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे, या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, संपतकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार हुसेन दलवाई, मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना एच. के. पाटील म्हणाले की, राज्यस्तरीय शिबिरानंतर ९ ते १४ जून दरम्यान जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात येतील. या शिबिराला मंत्री व राज्यातील जेष्ठ नेतेही उपस्थित राहतील. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा उभारी देण्यावरही भर देण्यात येईल. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान ७५ किमीची ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढली जाणार आहे. उदयपूर घोषणापत्रातील एक व्यक्ती, एक पद, या मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करतानाच केंद्रातील मोदी सरकारने ८ वर्षापासून सुरु केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार आहे. भाजपा सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर भाजपा कशी अपयशी ठरली ते जनेतपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारचा दृष्टीकोन हा केवळ व्यापारी राहिलेला आहे त्यातून काँग्रेसने उभे केलेले सर्व काही विकून खाजगीकरण केले जात आहे. लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असून ब्रिटिशांविरोधात लढलो तसेच आता या भाजपाविरोधात काँग्रेस कार्यर्त्यांना लढावे लागणार आहे.
यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या देशातील वातावरण बदलेले आहे. संविधानावर घाला घातला जात आहे तसेच काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. हे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देऊ आणि एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल यासाठी प्रयत्न करुया.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्य निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.