संगमेश्वर दि . ६ ( प्रतिनिधी ): गणपती उत्सव शांततेमध्ये पार पडावा यासाठी पोलीस विभाग सज्ज असून प्रत्येकाने तो शांततेमध्ये पार पडावा यासाठी सहकार्य केले पाहिजे उत्सवा दरम्याने सोशल मीडियावर समाजकंटकांकडून आक्षेपार्ह मजकूर अथवा व्हिडिओ निदर्शनास आल्यास पोलिसांना तात्काळ खबर द्यावी. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई स्थित भक्त गणेशोत्सवासाठी कोकणात येत असतात महामार्गावरील खड्डे भरण्याबाबत तसेच दिशादर्शक फलक लावण्यासाठी ठेकेदार कंपनीला सुचित करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.
संगमेश्वर पोलीस ठाणे येथे दहीकाला उत्सव, गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद अनुषंगाने शांतता समिती, मोहल्ला समिती, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष पदाधिकारी, दहीकाला मंडळ पदाधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी, ट्रॅव्हल्स एजंट, यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की गणेशोत्सव मिरवणूक आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही यासाठी दक्ष रहावे तसेच सणांच्या दरम्याने सामाजिक सलोखा राखून उत्सव साजरा करण्यात यावा असा त्या म्हणाल्या. बैठकीला पोलीस निरीक्षक सुरेश गावित उपस्थित होते.
गेले तीस वर्ष कार्यभार स्वीकारून सेवानिवृत्त झालेले लोवले गावचे पोलीस पाटील रविकांत पवार यांचा संगमेश्वर पोलीस ठाणे आणि पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी पोलिसांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे आपण चांगले काम केल्याचे सांगितले.
