Wildlife Week | वन्यजीव सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध उपक्रमांचे आयोजन

  • लेन्स आर्ट रत्नागिरी, निसर्ग सोबती आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचा पुढाकार
  • दि.२-८ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील वन्यजीव प्रेमींसाठी लेन्स आर्ट रत्नागिरी व सह्याद्री संकल्प सोसायटी एक अनोखा उपक्रम राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करत आहे. ह्याच उपक्रमातून “निसर्ग सोबती” या नेचर क्लबची स्थापना व लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे.या उपक्रमात वन्यजीव व जैवविविधतेचे संवर्धन याविषयी जनजागृती करण्यासाठी खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

२ ऑक्टोबर रोजी ह्या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन सकाळी १०.३० वाजता राधाबाई शेटे सभागृह, गोगटे कॉलेज येथे होईल. ह्याच दिवशी जिल्ह्यातील जैवविविधता, विविध प्रजाती, त्यांचे अधिवास व संवर्धन ह्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून त्यासाठी सृष्टी संवर्धन फाऊंडेशनचे विशाल भावे व सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे व निसर्ग मित्रमंडळ संस्थेतील तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ह्याच दिवशी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत “निसर्ग सोबती” ह्या क्लबचे उद्घाटन व रूपरेषा कथन केली जाईल. रत्नागिरीतील अश्या स्वरूपाचा, जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात, दऱ्या खोऱ्यात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन तयार झालेला हा पहिला वहिला उपक्रम असल्याचे मत निसर्ग सोबतीच्या प्रमुख निखिता शिंदे यांनी दिले.

सदर उपक्रमातून वन्यजीव ज्यात प्रामुख्याने पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरे आणि कीटक असे चार विभाग होतात. अश्या नानाविध प्रजातींची ओळख, त्यांचे राहणीमान, त्यांना आवश्यक व पोषक असे विशिष्ठ वातावरण आणि त्यांचे संवर्धन याची माहिती तरुण पिढीला निश्चितच होईल असा विश्वास सह्याद्री संकल्प सोसायटीच्या प्रतीक मोरे यांनी दर्शविला. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ६-८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील जैवविविधता आणि वन्यजीव ह्या विषयावर लेन्स आर्ट रत्नागिरी तर्फे निवडक २५० फोटोंचे प्रदर्शन पटवर्धन हायस्कूल येथे लावण्यात येणार असून ह्याच कालावधीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली “नेचर ट्रेल”चे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे लेन्स आर्ट रत्नागिरीच्या सिद्धेश वैद्य यांनी सांगितले.

या उपक्रमाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सर्व निसर्गप्रेमी यांनी घ्यावा असे आवाहन निसर्ग सोबती, लेन्स आर्ट रत्नागिरी आणि सह्याद्री संकल्प संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE