वारंवार तक्रारी करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष
देवरूख : संगमेश्वर एस. टी. बस स्थानकातील स्वच्छ्तागृह व परिसरातील अस्वच्छतेने सर्व परिसरात दुर्गंधी येत असून याबाबत वांरवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने या गलथान कारभाराबाबत संगमेश्वर बसस्थानक येथे डिंगणीचे सरपंच मिथून निकम, सुभेदार फौंडेशनचे सुधीर चाळके, दीपक चाळके यांच्या नेतृत्वाखाली खाडी भागातील युवकांनी धडक दिली.
यावेळी प्रशासनाला स्वच्छ्तागृहाच्या स्वच्छतेच्या बाबतीत असणाऱ्या समस्या दाखवून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करून येत्या १ आँक्टोबरला देश पातळीवर सुरू होणाऱ्या स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून दुर्गंधी समूळ नष्ट करून जनतेला बसस्थानकात मोकळा श्वास घेता यावा यासाठी येत्या 2 दिवसात सर्व समस्या ठेकेदाराकडून वा प्रशासनाने मार्गी लावाव्यात. तसे न केल्यास बसस्थानकावर धडक देवून सर्व परिसर व स्वच्छतागृहात असलेली सर्व घाण स्वयंस्फूर्तीने दूर करू ती दुर्गंधीयुक्त घाण कंट्रोल केबिनमधे टाकू, असे ठणकावून सांगण्यात आले. यावर दोन दिवसात सर्व परिसर स्वच्छ करू असे प्रशासनाच्या तीने सांगितले गेले.
या वेळी युवा नेते मिथुन निकम, सुधीर चाळके, दिपक चाळके, मयूर निकम, जयकुमार चाळके, मुरलीधर चाळके यांचे सह खाडीपरिसरातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
