चिपळूणमधील पूल दुर्घटनेस जबाबदार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा
मुंबई-गोवा जनआक्रोश समितीची मागणी
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहाद्दूर शेख नाका येथील पुल दुर्घटना संदर्भात मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधीनी चिपळूण येथे घटनास्थळी भेट दिली. या भेटीनंतर चुकून पोलिसांना या संदर्भातील निवेदन देऊन ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
या दुर्घटनेबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण भवन येथील कार्यालयात आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी जनआक्रोश समितीच्या वतीने CA निलेश घाग, श्री प्रकाश पालांडे, श्री सुरेंद्र पवार (शाहीर) आणि श्री राजेश आयरे यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
महिनाभरापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गीका पूर्ण केल्याने शासनाने केलेला गौरव ज्यांनी स्वीकारला ते सर्व गौरवशाली अधिकारी उपलब्ध नसल्याने भेट झाली नाही.
जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधीनी चिपळूण येथील घटनास्थळी पाहणी केली. यानंतर चिपळूण पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांची भेट घेण्यात आली व त्यांच्या सोबत चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करून निवेदन देण्यात आले. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस ठाणे यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करु व फिर्यादी दाखल करून आपल्या मागणीचा नक्कीच विचार करून समितीला सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी जनआक्रोश समितीचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट श्री.संदीप विचारे, चिपळूण प्रतिनिधी इंजिनियर श्री.पराग लाड आणि ॲडव्होकेट स्मिता कदम उपस्थित होत्या.
सर्व कोकणवासीय जनतेने अशी तत्परता दाखवून प्रशासन व सरकारवर दबाव ठेवून जाब विचारल्याशिवाय मागील १७ वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती याबाबत सर्व पातळीवर आवश्यक कारवाई करत राहिल असे Adv. स्मिता कदम यांनी सांगितले.