नाणीज, दि. २१ : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा व अनेक उपक्रमांचा फायदा सरकारलाही होतो आहे. त्याचबरोबर त्यांचे समाजोपयोगी कार्य मोठे आहे. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात सहभागी होण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
सुंदरगडावर आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी ते व उद्योगमंत्री उदय सामंत येथे आले होते. याचवेळी त्यांच्या हस्ते महामार्गावरील अपघात ग्रस्तांसाठी उपयुक्त असलेल्या आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आता संस्थानकडे या सेवेत एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत झाल्या आहेत.
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून ५६ हजारांवर लोकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणे, संप्रदायाच्या माध्यमातून लाखो पिशव्या रक्त संकलन, अपघातग्रस्तांसाठी असलेली मोफत रुग्णवाहिका सेवा यांचा गौरवाने उल्लेख करून श्री फडणवीस पुढे म्हणाले,‘‘ देहदानाचे केवळ संकल्प झाले नाहीत तर आत्तापर्यंत ४५ जणांच्या नातेवाईकांनी पार्थिव त्या त्या ठिकांणी पोहोचवले आहेत. आता महाराजांनी देहदानाला पूरक अशी अवयवदानाची चळवळ सुरू करावी. त्याचाही अनेक गरजूंना लाभ होईल. ते अवयव संबंधीत रुग्णालायापर्यंत वेळेत पोहोचावे लागतात. त्यासाठी आम्ही ग्रीन कॉरिडोर बनवून ते वेळेत पोहोचवू.’’
ते म्हणाले,‘‘ संत समाजाचा विचार करतात. समाजाला दिशा देण्याचे, त्यांच्यात जागरुकता आणण्याचे काम करतात. त्यांच्या अध्यात्मिक बैठकीतून माणसे तयार होतात. ते सामान्यातील असामान्यत्व जागृत करतात. त्यामुळेच महाराजांचे सर्व उपक्रम चांगले चालतात.’’
ते पुढे म्हणाले,‘‘ भारतीय संस्कृती दहा हजार वर्षांपूर्वीची सर्वाधिक काळ चालत आलेली असून ती पूर्ण विकसित आहे. पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा आपण भिन्न आहोत. त्याला कारण येथील संतपरंपराच आहे. संतानी समाजाकरिता जगायला शिकवले. म्हणून आपली संस्कृती टिकून आहे. संत दुर्बलाच्या पाठिशी उभे राहतात, त्याला अध्यात्मिकदृष्ट्या उभे करतात. आपण जगायचे व दुसर्यालाही जगवायचे ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे. ते महाराष्ट्रातील धर्मांतराचे षडयंत्र नेस्तनाबूत करण्याचे काम सतत करीत आहेत. त्यांच्या कार्याचा फायदा सरकारला होतो. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करू. महाराजांचा संदेश लक्षात ठेवून एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. त्यांचे मी अभिष्टचिंतन करतो.’’
उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी जगद्गुरूश्रींना शुभच्छा देऊन म्हणाले,‘‘ नाणीजसारखे दुसरे तीर्थक्षेत्र नाही. महाराजांनी ते जगाच्या नकाशावर आणले. धर्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. अपघातावेळी अनेकदा शासनाच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर
संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते, एवढी तत्परता आहे. इथली शिस्त वाखाणण्यासारखी आहे. येथे प.पू. कानिफनाथ महाराजांचे कामही चांगले आहे.
प्रारंभी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. श्री फडणवीस यांना भरपूर मोठे होण्याचा आशीर्वाद दिला. रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे कसे सुचले तो अनुभव सांगितला. ते म्हणाले,‘‘ या सेवेसाठी रुग्णवाहिका देणारे सामान्य भक्तगण आहेत. ही सेवा भारतभर करण्याचा संकल्प आहे. आम्ही हिंदूनी एकजुटीने राहिले पाहिजे. इस्राईल-हमास युद्धातून आपल्याला भरपूर शिकायला मिळाले आहे. जे यापासून बोध घेणार नाहीत ते संपणार आहेत. म्हणून मी म्हणत असतो की, ‘हिंदू खतरेमे है|’ आपल्याकडे धर्माबद्दल स्वाभिमान कमी आहे. पण थांबलो तर वेळ निघून गेलेली असेल. यहुदी आपल्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली तर काय होईल? म्हणून जातीपातीत वाटले न जाता हिंदूनी एक व्हावे. त्यातच त्यांचे कल्याण आहे.’’
या सोहळ्याचे आभार प.पू. कानिफनाथ महाराज यांनी मानले. सौ. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संतपीठावर औसा येथीलआमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हास घोसाळकर, सौ. उर्मिला घोसाळकर, पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, राहुल पंडीत, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.