पावस येथे सामूहिक शस्त्र पूजनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावतीने श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्र पूजनाचे आयोजन दसऱ्याला करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दादा देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.


कार्यक्रमाचा उद्देश सांगताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी म्हणाले की, विजयादशमीचा दिवस अर्थात दसरा म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय मिळाल्याचे प्रतिक मानले जाते. या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुराचा, प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्म संपवला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले होते. म्हणून या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विजयादशमीच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होण्याकरीता सामूहिक शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यानंतर श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री. चंद्रहास विलणकर आणि श्री. वैभव देशमुख यांच्या हस्ते शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. सदानंद देसाई यांनी मंत्र पठण केले. त्यानंतर श्री दुर्गादेवीची सामूहिक आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित हिंदु बंधू-भगिनींनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेचे उच्चारण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश लाड यांनी केले.


या कार्यक्रमाला सर्वश्री संतोष सामंत, सुभाष पावसकर यांसह देवस्थानचे सर्व विश्वस्त आणि सर्वश्री हरिष सामंत, सुरेश गुरव, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे आदी बहुसंख्य ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विजय गुरव, नामदेव गुळेकर, संजय मेस्त्री आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE