रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात सीएमईजीपीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी शुक्रवारी विशेष शिबीराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरबीआयचे विश्वजीत दास दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, सर्व बँकांनी शुक्रवारी विशेष शिबीराचे आयोजन करावे. या शिबीरात लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीची पत्र द्यावीत. या शिबीरासाठी जिल्हा उद्योग केंद्रांने लाभार्थ्यांना संपर्क करुन, कागदपत्रे मागवून घ्यावीत. ज्या बँकांची कामगिरी कमकुवत आहे अशा बँकांनी विशेष मेहनत घ्यावी. विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे मंजूर करुन उद्दिष्ट पूर्ण करावे. महामंडळांनीही प्रकरणे वाढवावीत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पथदर्शी प्रकल्प करावेत. प्रलंबित प्रकरणांबाबत बँकांनी मंजुरीसाठी विशेष लक्ष द्यावे. प्रकरणे मंजूर होणार नसतील तर कारणासह लाभार्थ्यांना कळवावे. राज्यात जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असेही ते म्हणाले.
