दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. दापोलीमध्येही चिमुकल्यांसह तरुणांनी विविध किल्ले साकारले आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी रविवार १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दापोली सायकलिंग क्लब तर्फे सायकल फेरी काढण्यात आली.
आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळस्कर नाका- प्रभूआळी- झरीआळी- कोकंबा आळी- फॅमिली माळ- वडाचा कोंड- लालबाग- उदयनगर- आझाद मैदान अशा ९ किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या सायकल फेरी मार्गावरील किल्ल्यांना भेट देऊन ते बनवणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. दिवाळीमध्ये दगड मातीपासून किल्ले बनवण्याची मजा काही वेगळीच असते. सुराज्य मित्र मंडळ यांनी साकारलेला भव्य सुवर्णदुर्ग, प्रभुआळी येथील भव्य राजगड, तोरणा, सुवर्णदुर्ग, शिंदे किरडावकर आंग्रे व मित्रमंडळींनी बनवलेले किल्ले, साहिल बामणे यांचा तोरणा, लालबाग येथील राळे, पाटील यांचा पुरंदर वज्रगड पाहण्यासारखे आहेत. तसेच या मार्गावर इतर अनेक किल्ले मस्तच सजवलेले आहेत. सर्वांनी हे किल्ले बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, सजावट इत्यादींबद्दल जाणून घेतले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात.
या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, सुधीर चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. २६-२७ नोव्हेंबर २०२३ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉन, सिझन ४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची नोंदणी लवकर करावी असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.